अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या झी मराठीवरील ‘माझा होशील ना (Maza Hoshil Na)’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला. पण लॉकडाऊनमुळे मालिकांचं चित्रीकरण देखील ठप्प झालं आणि प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकेचे नवीन भाग पाहायला मिळाले नाही. पण आता प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी खुशखबर म्हणजे ‘माझा होशील ना’ मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील प्रमुख कलाकार पुण्याहून पुन्हा मुंबईत आले. साधारणतः तीन महिन्यानंतर मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांप्रमाणेच कलाकार देखील गेल्या अनेक दिवसांपासून याची आतुरतेनं वाट पाहत होते.
याबद्दल बोलताना अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) म्हणाली,
“मुंबईत आल्यानंतर जवळपास १५ दिवस मी क्वारंटाईन होते. या दिवसात मी माझ्या भूमिकेच्या अभ्यासावर अधिकाधिक भर दिला.
येत्या काळात मालिकेत काय बदल होतील किंवा शूटिंगसाठी स्वतःला तयार करण्यासाठी माझी घरच्याघरी तालीम सुरु होती.
करोनामुळे पुढचे अजून काही दिवस स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. नियम पाळून शूटिंग करावं लागेल.
या गोष्टीला खूप घाबरून न जाता, सकारात्मकतेनं मी याला सामोरं जाऊन काम करण्याचं ठरवलं आहे. शिवाय, खूप दिवसांनंतर काम करण्याचा
वेगळाच उत्साह असेल. त्यामुळे शूटिंग सुरू झाल्यानंतरही आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊन पूर्वीसारखीच मजा करत आमचं काम
करणार आहोत.
निर्माते-दिग्दर्शक त्यांच्या परीनं सगळी खबरदारी घेतीलच. परंतु, मीही स्वतःची योग्य ती काळजी घेईन. शिवाय,
सर्व सरकारी नियमांचं मी पालन करणार आहे.”